मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून . या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा आणि सर्व आरोपींना अटक व्हावी तसेच तपासाची माहिती आपल्या कुटुंबाला मिळावी या मागणीसाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मस्साजोग गावात आंदोलन केलं. त्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एसपी नवनीत कॉवत आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांशी फोनवर बातचित करत या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला याचा आढावा घेतला. यावेळी तपासामध्ये कुणालाही दयामया दाखवू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तपासात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कुणावरही दयामया दाखवू नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज सकाळी केलेले आंदोलन जवळपास चार तास चाललं. त्यांनी पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरावं यासाठी डीवायएसपी, एसपी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. या प्रकरणात तपास कुठपर्यंत झाला? याची माहिती धनंजय देशमुख यांना हवी आहे. अखेर त्यांना तपासाची माहिती दिली जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर ते टाकीवरुन खाली उतरले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेत सीआयडी आणि एसपींसोबत फोनवर बातचित केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा छडा लवकराच लवकर लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची शक्यता आहे.