राज्यात पुन्हा मुसळधार, पुढील तीन दिवस सर्वत्र पावसाची शक्यता, हवामान विभागाची माहिती
राज्यात पुन्हा मुसळधार, पुढील तीन दिवस सर्वत्र पावसाची शक्यता, हवामान विभागाची माहिती
img
दैनिक भ्रमर
दीर्घ विश्रांती नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.  दरम्यान ,आता हवामान विभागाने राज्यात पुढील तीन-चार दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या कोकणात वादळी वाऱ्यांसह सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत पुढील दोन दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत आज आणि उद्या अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपात पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत आज सकाळपासून अनेक भागात अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यासोबतच विदर्भात सर्वत्र विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा वर्तवला आहे.

दरम्यान , गेल्या 24 तासांपासून उकाडा वाढल्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार, तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाकडून आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group