राज्यात उन्हाचा पारा वाढला ! ''या'' जिल्ह्यात  उष्माघाताचा पहिला बळी
राज्यात उन्हाचा पारा वाढला ! ''या'' जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी
img
दैनिक भ्रमर
राज्यातील तापमानाचा पारा वाढतच चालला असून मोठ्या प्रमाणात उष्णता वाढत आहे. या वाढत्या उष्णतेला पाहता हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. याचदरम्यान,  आता एक धक्कादायक  बातमी समोर आली आहे. राज्यात उष्माघाताचा पहिला बळी  गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. तर दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात ४९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तापमान 40 अंशाच्या पुढे सरकल्याने हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. या तापमानामुळे सोयगाव तालुक्यात पहिला बळी गेला आहे. निमखेडी बस थांब्यावरील ही घटना घडली. उन्हात बस थांब्यात विसावा घेणार्‍या एका प्रवाशाचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. अमोल दामोदर बावस्कर असे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


उष्णतेपासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती केली जात असून उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांनी साठी सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्यात आले आहेत. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष तसेच बेड ची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

दरम्यान, उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. पाणी पातळीत घट होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरींनी देखील आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसायला आता सुरुवात झाली.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मागील 8 दिवसापूर्वी 16 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता मात्र त्यामध्ये आता भर पडून सद्यस्थितीत 36 गावांना 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान तापमानाचा पारा 39 अंशाच्या वर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन देखील होत आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group