पर्यावरणपूरक गणेशोत्सव;  जाणून घ्या राज्य शासनाने जारी केल्या उपयुक्त टिप्स
पर्यावरणपूरक गणेशोत्सव; जाणून घ्या राज्य शासनाने जारी केल्या उपयुक्त टिप्स
img
दैनिक भ्रमर
दरवर्षी सर्व भक्त आपल्या गणरायांची खूप  आतुरतेने वाट पाहत असतात , पण आता मात्र ही प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांतच संपणार आहे . यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी, शनिवारी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या दिवसापासून देशात गणेशोत्सवाला सुरुवात होईल.या पार्श्वभूमीवर शासन आणि संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम राबवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत.

प्रशासनाने शाडू अथवा मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, कृत्रिम कुंडात मुर्ती विसर्जन, मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांवर भर, लोककला व शिवकालीन साहसी कलांच्या सादरीकरणातून या कलेला चालना, डॉल्बीचा मर्यादित आवाज ठेवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

अशाप्रकारे साजरा करा पर्यावरणपूरक गणेशोत्सव-

सध्या बहुतांश गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवल्या जातात. तसेच या मूर्तींना सजवण्यासाठी हानिकारक ठरणारे रंग वापरले जातात. या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले तरी, त्या पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत. त्यामुळे जल, वायू प्रदुषणात भर पडते. म्हणूनच शाडू अथवा मातीच्या गणेश मूर्ती बसवण्यावर भर देणं गरजेचे आहे. 

 तसेच ,  गावामध्ये ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करताना धातू, संगमरवरी, इतर पर्यायी किंवा मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करणे, तसेच घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा नजिकच्या कृत्रिम तलाव, कुंड अशा कृत्रिम विसर्जनस्थळी करणे गरजेचे आहे.

नदी प्रदुषण टाळण्यासाठी नदीमध्ये मूर्ती विसर्जन करणे टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी केले आहे. फटाक्यांमधील हानिकारक वायू आणि विषारी पदार्थ वातावरणात मिसळले गेल्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होवून आरोग्याला धोका पोहोचू शकतो. यासाठी सर्वच सार्वजनिक सण, समारंभांमध्ये फटाक्यांचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे.

रहिवासी क्षेत्रात रात्रीच्या वेळी 45 डेसिबलच्या आसपास आवाजाची पातळी असणे आवश्यक असते. आरोग्याच्या हितासाठी सण, समारंभ, मिरवणुकांदरम्यान आवाजाची पातळी मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. डॉल्बी स्टेरिओचा आवाज शक्यतो 80 डेसिबल पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण स्पीकरच्या समोर उभे राहणे टाळणे आवश्यक आहे. लेझर लाईटमुळे दृष्टी कमी होण्याचा किंवा गमावण्याचा धोका होऊ शकतो. म्हणूनच लेझर लाईट डोळ्यावर पडणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात होणारे जलस्त्रोतांचे प्रदूषण आणि गाळाचे प्रमाण अधिक होऊन उद्भवणारा पुराचा धोका, फटाके आणि ध्वनीक्षेपकांनी मर्यादा ओलांडल्यामुळे झालेले हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण हे मानवाला विशेषत: वृद्ध, गर्भवती आणि लहान मुलांना आघात पोहचविणारे आहे. लोकांनी याबाबत सजगपणे बदल स्वीकारुन पर्यावरण स्नेही कृती केली पाहिजे.

तसेच , गणेशोत्सव, नवरात्र तसेच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त घेण्यात येणाऱ्या उत्सवातून महापुरुषांचे विचार व त्यांच्या कार्याचा तसेच सामाजिक प्रबोधनपर विषयांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानिमित्त केलेले देखावे पाहण्यासाठी हजारो नागरिक गणेश मंडळांना भेटी देतात. देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या व उत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देखावे तयार करताना पर्यावरणपूरक घटकांच्या वापरावर भर दिल्यास प्रदूषणही रोखले जाईल.

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group