दिंडोरी (चंद्रशेखर गोसावी) :- लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बँकेच्या दारातच मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली. राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये असलेल्या उमराळे येथे शासनाची लीड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेत ही दुर्दैवी घटना घडली आहे. या उमराळे शाखेला आजूबाजूचे सुमारे 40 गाव जोडले गेले असून या बँकेमध्ये सातत्याने गर्दी असते. ज्या सरकारी बँकेच्या शाखा आहेत त्या सर्व दिंडोरी गावात आहेत.
आज नेहमीप्रमाणे बँक चालू होती आणि त्यावेळी सुलभा भाऊराव लहानगे (रा. आळंदी डॅम) ही गर्भवती महिला आपल्या लाडक्या बहीण योजनेचे जमा झालेले पैसे काढण्यासाठी आली होती. तसेच या महिलेला आपल्या बँक खात्यातील केवायसी देखील करावयाची होती. पण बँकेमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. त्यामुळे या महिलेला रांगेत उभे रहावे लागले रांग खूप मोठी होती आणि डोक्यावर ऊन देखील होते. त्यामुळे काही वेळानंतर या सुलभा लहानगेला चक्कर आली आणि ती तिथेच पडली. रांगेत उभे असलेल्या नागरिकांनी तिला तातडीने बाजूला करून मदत केली पण डॉक्टरही येण्यास विलंब झाल्याने या महिलेचा बाळासह मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला निराधार असून तिला दोन मुले आहेत.