आज काल प्रेमयुगुल आणि त्यांचा मध्ये होणारे वादविवाद अशा अनेक घटना घडत असतात.दरम्यान अशाच एका प्रेमयुगुलाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेम संबंधातून 22 वर्षांच्या तरुणीची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार नवीन पनवेल मध्ये घडला आहे.
तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:वरही वार केले आहेत. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर कामोठ्याच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.हा खळबळजनक प्रकार नवीन पनवेलच्या सेक्टर 18 मध्ये घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या तरुणीचं नाव जागृती हरेश सत्वे (राहणार ज्योती अपार्टमेंट, सेक्टर 18, नवीन पनवेल) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जागृतीचे आरोपी निकेश सुधाकर शिंदे (राहणार दिवेगाव, ठाणे वय 25) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. तीन महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं, यानंतर जागृतीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय निकेशला आला. यानंतर निकेश 31 जानेवारीला जागृतीच्या घरी गेला.
दुसऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस, असं बोलून निकेशने जागृतीसोबत घरामध्येच वाद घालायला सुरूवात केली. तसंच तिला शिवीगाळ केली आणि हाताने मारहाणही केली. यावेळी जागृतीची आई आणि तिची बहीणही तिकडे होत्या. संध्याकाळी पावणेसहा ते साडेसहाच्या सुमारास निकेशने जागृतीच्या गळ्यावर चाकूने वार केले, त्यानंतर निकेशने स्वत:च्या हातावर आणि गळ्यावरही वार केले.
निकेशने केलेल्या हल्ल्यात जागृतीचा मृत्यू झाला, तर निकेशला जखमी अवस्थेमध्ये कामोठ्याच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. निकेशवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी निकेशवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.