वैभव देवरेचे पाय आणखी खोलात; सावकारी नंतर आता केली 77 लाख 50 हजारांची फसवणूक
वैभव देवरेचे पाय आणखी खोलात; सावकारी नंतर आता केली 77 लाख 50 हजारांची फसवणूक
img
Prashant Nirantar

नवीन नाशिक (प्रशांत निरंतर) :- जमिनीचे बनावट कागदपत्र दाखवून ते खरे असल्याचे भासवून गॅरेजचालकाची 77 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खासगी सावकार वैभव देवरे, त्याची पत्नी सोनल हिच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सदाशिव बनगर पवार (रा. फडोळ मळा, अंबड, नाशिक) यांचे कामटवाडा येथे कामिनी ऑटोटेक नावाचे फोरव्हीलरचे गॅरेज व विल्होळी येथे शिवसाधना प्रा. लि. या नावाची क्रेन मॅन्युफॅक्चरिंगची स्वत:ची कंपनी आहे. फिर्यादी पवार यांना कंपनीच्या कामासाठी जमीन खरेदी करायची होती. त्यासाठी ते जागेच्या शोधात होते.

सप्टेंबर 2019 ते ऑक्टोबर 2024 या दरम्यानच्या कालावधीत आरोपी गोविंद पांडुरंग ससाणे (कामटवाडा, नाशिक), वैभव यादवराव देवरे, सोनल वैभव देवरे (दोघेही रा. सीमा पार्क अपार्टमेंट, राणेनगर, चेतनानगर, नाशिक) व निखिल पवार (रा. स्वामी विवेकानंद पवार, सिडको) या चौघांनी संगनमत करून हिरावाडी येथील जमिनीची बनावट कागदपत्रे दाखवून ती खरी असल्याचे भासविले, तसेच गोविंद ससाणे यांच्या सारुळ येथील जमिनीचा व्यवहार अनेक लोकांसोबत केलेला असल्याचे माहीत असूनदेखील फिर्यादी पवार यांची फसवणूक करण्याचा कट या चौघा आरोपींनी रचला.

त्यानंतर या दोन्ही जमिनींचा व्यवहार वैभव देवरे याने इतर साथीदारांच्या मदतीने करण्याचा ठरला. त्यावेळी सारुळ व हिरावाडी येथील जमीन खरेदीचा व्यवहार ठरला. त्यापोटी फिर्यादी पवार यांच्याकडून 63 लाख 49 हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे, तसेच वैभव देवरे व निखिल पवार यांनी सावकारी व्यवसायाकरिता फिर्यादी पवार यांना बळजबरीने ऑनलाईन व रोखस्वरूपात असे एकूण 35 लाख रुपये देण्यास भाग पाडले. त्यातील 20 लाख रुपये हे परत करण्यासाठी फिर्यादी पवार यांनी वैभव देवरे याला विनंती केली असता त्याने हे पैसे परत देण्यास नकार देऊन त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली, तसेच खासगी सावकार वैभव देवरेची पत्नी सोनल देवरे हिने फिर्यादी पवार यांना फोनवरून विनयभंगाची खोटी तक्रार करण्याची धमकी दिली.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गोविंद ससाणे, वैभव देवरे, सोनल देवरे व निखिल पवार यांच्याविरुद्ध फसवणुकीसह जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group