घरगुती ग्राहकांना दुहेरी लाभ, वीजदर कपातीसोबतच दिवसाच्या वीज वापराला अधिक सवलत
घरगुती ग्राहकांना दुहेरी लाभ, वीजदर कपातीसोबतच दिवसाच्या वीज वापराला अधिक सवलत
img
दैनिक भ्रमर
महावितरणा ने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीजदर याचिकेमध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना दिवसा वीज वापरल्यास अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे, अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात ऊर्जा परिवर्तासाठी भरीव काम करून सौर ऊर्जा वापराला महत्त्व दिले आहे. सौरऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळाल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे. त्यासोबतच सौरऊर्जा दिवसा मिळणार असल्याने त्यावेळी जे घरगुती ग्राहक वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणेही महावितरणला शक्य झाले आहे, असे सांगण्यात आले.

महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येईल. आर्थिक वर्ष २०२५ -२६ मध्ये प्रती युनिट ८० पैसे, २०२६ -२७ मध्ये ८५ पैसे, २०२७ -२८ मध्ये ९० पैसे, २०२८ -२९ मध्ये ९५ पैसे आणि २०२९ -३० या वर्षात १ रुपया सवलत देण्यात येईल. आयोगाने मान्यता दिल्यानंतर दि. १ एप्रिलपासून ही सवलत सुरू होऊ शकते.

कोणत्या वेळी वीज वापरली त्यानुसार विजेच्या दरात सवलत देण्यास तांत्रिक भाषेत टीओडी म्हणतात. ही सुविधा आतापर्यंत फक्त उद्योगांना होती पण आता ती उद्योगधंद्यांसोबतच घरगुती ग्राहकांनाही देण्यात येणार आहे.

घरगुती वीज वापरात मिक्सर, इस्त्री, वॉशिंग मशिन, ओव्हन इत्यादींना मोठ्या प्रमाणात वीज लागते. या उपकरणांचा वापर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत करण्याचे नियोजन केले तर घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा प्रभावी वापर करता येईल. तसेच उन्हाळ्यात दिवसा पंखे, कूलर आणि एसी यांचा वापर वाढतो. त्यावेळीही ग्राहकांना टीओडी सवलतीचा अधिक उपयोग होईल.

टीओडी मीटर मोफत मिळणार

टीओडी सुविधा मिळण्यासाठी वीज ग्राहकाने कोणत्या वेळेला विजेचा वापर केला हे समजणे आवश्यक आहे. घरगुती ग्राहकांकडे सध्या बसविलेल्या मीटरमध्ये टीओडीची सुविधा नाही. तथापि, घरगुती ग्राहकांना टीओडी सवलतीचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणकडून त्यांना मोफत टीओडी मीटर बसवून देण्यात येणार आहेत, असे समजते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group