मुंबई : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता कमालीची खालवली होती. मुंबईतील हवा खराब झाल्यामुळे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. तुमच्या विकास कामांपेक्षा नागरिकांचे जीवन महत्वाचे आहे. नागरिकांचे जीव धोक्यात येणार असतील तर सर्व विकास कामे थांबवू, अशा शब्दात दम न्यायालयाने भरला होता. त्यानंतर राज्य सरकार खळबळून जागे झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई पाहणी दौऱ्यावर आहेत. मुंबईतील वाढतं प्रदूषण, मुंबईतील स्वच्छता याबाबत मुंबई महानगर पालिकेकडून काय उपाययोजना करण्यात आली आहे, याची प्रत्यक्ष पाहणी आज केली जात आहे. यासाठी मुख्यमंत्री आज सकाळी पाच वाजल्यापासून मुंबईत विविध ठिकाणी भेट देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहाटेपासून मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची स्वतः उपस्थित राहून पाहणी करत आहेत. कलानगर फ्लायओव्हरपासून सुरुवात या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली आहे.
असा असेल मुख्यमंत्र्यांचा दौरा -
- सकाळी 6.00 वाजता :- कलानगर फ्लायओव्हरपासून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मार्गे सांताक्रूझ मिलन सबवेपर्यंत
- सकाळी 6.20 मिनिटांनी :- मिलन सबवे ते नेहरू जंक्शन रोड, नेहरू रोड, दयालदास रोड, पायावाडी रोड, मिलन सबवे ब्रिजपासून रेल्वे ट्रॅकपर्यंत
- सकाळी 6.40 वाजता :- HW वॉर्ड
- मीलन सबवे ब्रिज रेल्वे ट्रॅक ते एसव्ही रोड जंक्शन
- साने गुरुजी रोड ते रिलीफ रोड
- रिलीफ रोड ते जुहू तारा रोड, जुहू तारा रोड ते जुहू तारा लिंकिंग रोड जंक्शन
- लिंकिंग रोड,टर्नर रोड,कार्टर रोड
स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज आढावा घेत आहेत. प्रदूषणाच्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी सुरू आहे. तसंच पालिकेच्या उपाययोजनांचीही पाहणी मुख्यमंत्री करत आहेत. यासोबत मुंबईत सुरू असलेल्या कामांचीही पाहणी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे पाच वाजताच रस्त्यावर उतरले. यावेळी कामाची पाहणी करताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल ऑन द स्पॉट घेत कारवाई करण्याचे आदेश दिले.