मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे. दरम्यान, मराठा मोर्चा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबईत कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेश दिले आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. आता जमावबंदीचे आदेश असताना मोर्चा कसा येणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सध्या शहरात गर्दीच्या, महत्त्वाच्या आणि अतिसंवेदनशील ठिकाणी बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथकांकडून तपासणी केली जात आहे. मुंबईत २८ जानेवारीपर्यंत पोलिसांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून २३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ६ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मोर्चा आज नवी मुंबईत धडकणार
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी काढलेलं आंदोलन आज गुरुवारी नवी मुंबईत पोहोचणार आहे. मनोज जरांगे यांच्यासह लाखो आंदोलक सोबत असणार आहेत. मराठा आंदोलकांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आली आहे. सर्व मार्केट कडकडीत बंद ठेवण्यात आळे आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये जेवणासह राहण्याची व्यवस्था केली आहे.