‘चकमक फेम’ प्रदीप शर्मा यांना जन्मठेप ; 'ते' प्रकरण नेमके काय होते?
‘चकमक फेम’ प्रदीप शर्मा यांना जन्मठेप ; 'ते' प्रकरण नेमके काय होते?
img
दैनिक भ्रमर
छोटा राजनचा हस्तक असल्याच्या आरोपावरून २००६ मध्ये झालेल्या रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याच्या चकमकीप्रकरणी सत्र न्यायालयाने निर्दोष ठरविलेले ‘चकमक फेम’ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. येत्या तीन आठवड्यांत त्यांना तुरुंगात हजर होण्यास सांगितले आहे. इतकेच नव्हे तर १२ पोलिसांसह एका खासगी इसमाची जन्मठेपही कायम केली आहे. बनावट चकमक प्रकरणात इतक्या मोठ्या प्रमाणात जन्मठेपेची शिक्षा कायम होण्याची ही पहिलीच घटना आहे.

उच्च न्यायालयाचा निकाल काय?

रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणात २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने २१ जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यामध्ये १२ पोलिसांचा समावेश होता. प्रदीप शर्मा यांची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या सर्वांनी आपल्या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याविरोधात राज्य शासनाने अपील दाखल केले होते. याशिवाय लखनभैय्या याचा भाऊ अॅड. रामप्रसाद गुप्ता यानेही याचिका दाखल केली होती. अशा १६ याचिकांवर निकाल देताना न्या. रेवती डेरे आणि न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवून जन्मठेप सुनावली तर उर्वरित १२ पोलीस आणि एका खासगी इसमाची जन्मठेप कायम केली. उर्वरित सहा जणांची मात्र निर्दोष मुक्तता केली. सुनावणी सुरू असण्याच्या काळात दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी केलेले अपील नैसर्गिक न्यायानुसार वगळण्यात आले.

राज्य सरकारकडून 'या' १४ 'आएएस' अधिकाऱ्यांची बदली

नेमके प्रकरण काय?

अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील नाना-नानी पार्कजवळ ११ नोव्हेंबर २००६ रोजी डी. एन. नगर आणि जुहू पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत छोटा राजनचा हस्तक असल्याच्या आरोपावरून रामनारायण गुप्ता उर्फ लखनभैय्या याला चकमकीत ठार करण्यात आले. मात्र ही चकमक बनावट असल्याचा आरोप लखनभैय्याचा भाऊ अॅड. रामप्रसाद गुप्ता याने केला होता. वाशी येथील निवासस्थानजवळून मुंबई पोलिसांच्या पथकाने लखनभैय्या आणि अनिल भेडा या दोघांचे अपहरण केले. त्याचवेळी आपण तात्काळ मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना फॅक्स करून लखनभैय्याच्या जिवाला धोका असल्याचे कळविले होते. मात्र आपल्या फॅक्सची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लखनभैय्या याला चकमकीत ठार केले, असा आरोप करीत अॅड. रामप्रसाद गुप्ता याने न्यायालयात धाव घेतली.

बनावट चकमक उघड

अॅड. रामप्रसाद गुप्ता यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत या प्रकरणी चौकशीची मागणी केली. उच्च न्यायालयाने अंधेरी रेल्वे मोबाइल न्यायालयाला चौकशी करण्याचे आदेश दिले. रेल्वे मोबाइल न्यायालयाने चौकशी करून अहवाल उच्च न्यायालयात सादर केला. या अहवालात लखनभैय्याची बनावट चकमकीत हत्या झाल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर न्यायालयाने परिमंडळ-९ चे तत्कालीन उपायुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आणि रामप्रसाद गुप्ता यांचा जबाब ‘एफआयआर’ म्हणून दाखल करण्याचे आदेश दिले. प्रसन्ना यांच्या पथकाने लखनभैय्याच्या बनावट चकमकीप्रकरणी गुन्हा दाखल करून ७ जानेवारी २०१० रोजी सर्वप्रथम प्रदीप शर्मा यांना अटक केली. त्यानंतर १४ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एकूण २१ जणांना अटक केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group