कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मुंबई महापालिका उपायुक्त संगीता हंसाळे यांना समन्स बजावलाय. बुधवारी त्यांच्यासह युवासेना सचिव सुरज चव्हाण आणि पाच कंत्राटदारांच्या कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर आता त्यांना समन्स बजावण्यात आला.
कोविड दरम्यान हंसाळे प्लॅनिंग विभागात सहाय्यक पालिका आयुक्त होत्या. पुरवठादारांकडून होणाऱ्या खिचडी वाटपावर देखरेख ठेवण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली होती.
मुंबई महानगरपालिकेने कोविड काळात मजुरांसाठी खिचडी वाटप सुरू केलं होतं. मात्र पुरवठादरांनी योग्य प्रमाणात खिचडी वाटप न करता पालिकेला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. कंत्राट वाटपात देखील गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून अंमलबजावणी संचालनालयाने देखील तपासाला सुरुवात केली आहे. खिचडी घोटाळ्या प्रकरणी संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यासह १० ते १२ जणांविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुजीत पाटकर यांच्यासह सुनिल बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हे दाखल करण्यात आलेत.