मोठी बातमी : अजित पवार तिघांना पाठवणार विधान परिषदेत ; 'या' नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
मोठी बातमी : अजित पवार तिघांना पाठवणार विधान परिषदेत ; 'या' नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
img
Dipali Ghadwaje
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांची यादी अंतिम करून लवकरच  राज्यपालांकडे मंजुरीला पाठवण्यासाठी सत्ताधारी महायुतीच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला आलेल्या ३ जागांवरील नावे निश्चित केल्याचे समजते. यामध्ये राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश असल्याची माहिती आहे. 

राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी या जागांची नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहे. अशातच अजित पवारांच्या पक्षाकडून रुपाली चाकणकर, आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचं नाव समोर आलं आहे. मात्र यावर अद्याप पक्षाकडून अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही.

यादी अंतिम करण्यासाठी हालचालींना वेग

विधान परिषदेच्या १२ राज्यपाल नियुक्त जागा भरण्यासाठीच्या हालचालीला वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात याविषयी गुरुवारी रात्री खलबते झाली होती. या १२ मध्ये भाजपला सहा, शिंदे सेनेला तीन, तर अजित पवार गटाला तीन जागा मिळणार असल्याची माहिती आहे. 

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच या नावांना मान्यता देऊन राज्यपालांकडे ती मान्यतेसाठी पाठविली जातील, असे समजते. राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती ३० ऑगस्टपूर्वी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी गेल्या महिन्यात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना सांगितले होते. विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. अशावेळी कोणत्याही परिस्थितीत या १२ जागा भरण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, अशाच पद्धतीने ही १२ नावे निश्चित केली जातील, असे म्हटले जाते.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group