मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांना 3 गुन्ह्यांसंदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. जानेवारी 2024 मध्ये जरांगे पाटलांवर गेवराई पोलीस ठाण्यात हे गुन्हे नोंद होते.
दरम्यान, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांचे गुन्हे शासन मागे घेणार आहे. त्यासाठी 31ऑगस्टपर्यंत या गुन्ह्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर होणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासाचा भाग म्हणून ही नोटीस दिली गेल्याची माहिती गेवराई पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असताना अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या अनेक सभा रात्री उशीरा, मध्यरात्री झाल्या तर काही ठिकाणी त्यांच्या आवाहनावरुन रास्ता रोको आंदोलन झाल्याने, जरांगे पाटलांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते. गेवराई तालुक्यात धोंडराई येथील सभा, गेवराईतील सभा आणि मुंबईला जाताना मादळमोही येथील सभा यामुळे त्यांच्यावर 3 गुन्हे नोंद होते.
मनोज जरांगेंवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल
काही दिवसांपुर्वी मनोज जरांगे यांनी राज्यातील अनेक भागामध्ये दौरे केले होते, सभा घेतल्या होत्या. या सभा घेत असताना अनेकदा रात्री उशिरा सभा घेतल्याबाबत, जेसीबीच्या माध्यमातून फुल उधळून स्वागत केलं आलं. तर स्वागतासाठी मोठी गर्दी देखील जमवण्यात आली होती. धोकादायक पद्धतीने जेसीबीचा वापर केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता.