राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची प्रसारमाध्यमांतून चर्चा झाली त्याहीपेक्षा अधिक चर्चा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या उपपमुख्यंत्री अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झाली.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुंबई दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी गणपती दर्शन घेतले. त्यानंतर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबंई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडेही गेले. शिवाय त्यांनी लालबागचा राजा गणपतीचे दर्शनही घेतले. या सर्व भेटींच्या चर्चा होत असताना या दौऱ्यात महायुतीतील घटक पक्ष म्हणून अजित पवार यांची अनुपस्थिती मात्र उठून दिसत होती.
अखेर दौरा आटोपून परतत असताना अजित पवार यांनी विमानतळावर जाऊन शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या भेटीत महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याचे समजते.
राजकीय करिअर घडविणाऱ्या शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये सहभागी झालो खरे, मात्र तरीही काम केही होत नाही, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात मोठी नाराजी आहे. खास करुन ही नाराजी विदर्भामध्ये पाहायला मिळते. राज्यातील इतरही अनेक ठिकाणी नाराजी असून, सत्तेमध्ये असूनही मंत्री काम करत नाहीत, अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दुसऱ्या बाजूला राज्यसभेच्या जागेवर प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा पाठवले. विशेष म्हणजे राज्यसभेची साडेचार वर्षे बाकी असतानाह त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठविण्यात आले. विधानपरीषदेसाठीही कोणाचा विचार केला जात नाही. त्यामुळे हा तिढा अजित पवार कसा सोडवणार याबाबत उत्सुकता आहे. शिवाय अमित शाह यांच्या दौऱ्यास दांडी मारणारे अजीत पवार पुढे काय निर्णय घेतात याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.