महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेद्वारे 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. गेल्या 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. आता या योजनेबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी राज्यातील अनेक महिलांनी सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, मालेगाव, बुलढाणा, संभाजीनगर, नंदूरबार यांसह ठिकठिकाणी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमधील भाषणादरम्यान या योजनेबद्दलची एक महत्त्वपूर्ण माहिती दिली.
महिलांना सबळ करणे महत्त्वाचे
आम्ही महिलांना आरक्षण दिलं आहे. पण तरीही महिलांना सबळ करणे महत्त्वाचे आहे. माझं कुटुंब सुखात राहिल पाहिजे, यासाठी माय-माऊली स्वत:च्या पोटाला चिमटा काढत असते. माझ्या मनात या माय-माऊलीसाठी काहीतरी केलं पाहिजे, अशी खंत होती. त्यामुळेच आम्ही ही योजना सुरु केली, असे अजित पवारांनी म्हटले.
17 ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार
माझ्या मनात खोटं नाही, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. कालच रात्री मी, मुख्यमंत्री आम्ही सगळे चर्चा करत बसलो होतो. या बैठकीत आम्ही लाडकी बहिण योजनेबद्दल चर्चा केली. ही योजना 90 टक्के महिलांपर्यंत पोहोचली आहे. कालच मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आलो आहे. येत्या 17 ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असेही अजित पवार म्हणाले.