रत्नागिरी : बदलापूर आणि कोल्हापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर रत्नागिरीतही तसाच प्रकार घडला आहे. नर्सिंगला असलेल्या एका १९ वर्षीय तरुणीला रिक्षात घेऊन शहराजवळील चंपक मैदानावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार काल सकाळी उघड झाला. मिळालेल्या माहितीनुसार , पोलिस त्या रिक्षाचालकाच्या शोधात आहेत. या पीडित तरुणीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला. नराधमाला अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस अधिकाऱ्यांना जमावाने घेराव घातला; परंतु पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. संशयित नराधमावर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जिह्यातील एक १९ वर्षी तरुणी नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास एसटीने ती साळवी स्टॉपवर आली. तिला चक्कर येण्याची सवय आहे. एसटीतून उतरल्यानंतर तिला मळमळत असल्याने तिने रिक्षाला हात दाखवला; परंतु रिक्षा विरुद्ध बाजूच्या रस्त्याला होती. ती तिथे चालत गेली. रिक्षात बसल्यानंतर मळमळत असल्याने रिक्षाचालकाकडे पाणी मागितले. पाणी प्यायल्यानतंर पुढे काय झाले हे कळलेच नाही, असे तिने जबाबात म्हटले आहे. भान आले तेव्हा चंपक मैदानात नको त्या अवस्थेत ती असल्याचे लक्षात आले. ती कशीबशी रस्त्यावर आली.
तिने एका दुचाकीवाल्याकडे मदत मागितली. त्याच्याबरोबर ती चर्मालयात आली. या दरम्यान तिने आई-वडील,बहिणीला फोन करून घडला प्रकार सांगितला. तेव्हा एका नातेवाइकाच्या मदतीने तिला चर्मालयातून घरी साळवीस्टॉप येथे आणले. तेथे नातेवाइकांशी चर्चा झाल्यानंतर ११२ला कॉल करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिस तत्काळ दाखल झाले. या दरम्यान तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते. तिने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी संशयित नराधमाविरुद्ध बलात्काराचा भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) ६४ (१) अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी दिली.
साळवी स्टॉप ते चंपक मैदानापर्यंतच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपसण्यात आले. त्यामध्ये या मुलीच्या हालचाली कैद आहेत; परंतु त्यापुढे काय झाले हे कळलेले नाही. या दरम्यान तरुणीची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी तिचा जबाब घेतला. यामध्ये तिच्या अंगावर ओरखडे, जखमा आहेत. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे पुढे आले आहे.
पोलिसांनी साळवी स्टॉप येथील थांब्यावरील रिक्षाचालकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. कोण-कोण रिक्षा व्यावसायिक या थांब्यांवर थांबतात, त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. साळवी स्टॉप ते चंपक मैदानापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. त्यामुळे काहीतरी धागा मिळेल, अशी पोलिसांची अपेक्षा आहे.