सटाणा - मुंबईतील डोंबिवली येथे दोन मुलींच्या विनयभंग च्या घटनेतील आरोपीला मानपाडा पोलिसांनी येथुन अटक केली आहे . या ठिकाणी अचानक पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की,डोंबिवली पूर्वेतील सागाव भागात घडलेल्या या गंभीर घटनेत दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या प्रवीण पाटील या आरोपीला मानपाडा पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील एका गावातून अटक केली आहे. मागील चौदा दिवसांपासून प्रवीण पाटील हा फरार होता. मानपाडा पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी विशेष पथक तयार केले होते, त्यात त्याला अटक करण्यात यश मिळवले.
काही दिवसांपूर्वी सागाव भागातील दोन अल्पवयीन मुली घराजवळ खेळत होत्या. त्यावेळी आरोपी प्रवीण पाटील त्यांना पाहून अश्लील हावभाव करू लागला. त्याच्या या अश्लील चाळ्यांमुळे मुली घाबरल्या आणि त्यांनी मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून परिसरातील लोक तेथे जमले. लोकांचा जमाव पाहून आणि मारहाण होण्याच्या भीतीने प्रवीण पाटील तिथून पळून गेला.
पीडित मुलींनी ही घटना त्यांच्या पालकांना सांगितल्यानंतर, पालकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पण आरोपी प्रवीण पाटील हा मिळत नव्हता त्याला शोधण्यासाठी पथक तयार केले असता या पथकाला यश आले.