हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचं निधन झालं आहे. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज सकाळीच 11.30 वाजता त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
चौटाला यांच्या निधनामुळे हरियाणा आणि देशाच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ओम प्रकाश चौटाला हे सात वेळा आमदार होते. पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत.
ओम प्रकाश चौटाला हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचे चिरंजीव होते. ओम प्रकाश चौटाला यांचा जन्म 1 जानेवारी 1935 मध्ये हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील चौटाला गावात झाला होता. चौटाला हरियाणाचे सातवे मुख्यमंत्री होते. त्यांचे वडील चौधरी देवीलाल चौटाला यांची हरियाणा राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका होती. हरियाणाची स्थापना झाल्यावर देवीलाल हे हरियाणाचे मुख्यमंत्री आणि नंतर भारताचे उपपंतप्रधान झाले होते.
ओम प्रकाश चौटाला यांनी हरियाणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते ग्रामीण भाग आणि शेतकऱ्यांच्या पाठी नेहमी खंबीरपणे उभे राहिले. सत्तेत असल्यावर आणि विरोधात असतानाही त्यांच्या भाषणात शेतकरी आणि ग्रामीण भागावर भाष्य असायचं. हरियाणातील सर्वात सक्रिय नेता म्हणूनही त्यांची ओळख होती.