राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.यानंतर सर्वांचं लक्ष आता मंत्रीमंडळ विस्तराकडे लागलं आहे.
काही खात्यावरून भाजपा आणि शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच गृहखात्यावरून एकनाथ शिंदे हे अजूनही आग्रही असल्याचं समजतंय. मात्र, गृहमंत्री पद शिंदेंना देण्यास भाजपाचा विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार नेमका कधी होणार आणि कुणाला किती मंत्रीपदे मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत सरकारमध्ये सहभागी झाले असले तरी गृहमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. मागील साडे सात वर्षांपासून गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडेच आहे. अशात या खात्याच्या तिढयाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलंय. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपद मागितलं आहे का? असा सवाल फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर “नाही! त्यांनी असं कुठलंही मंत्रीपद मागितलेलं नाही. त्यांनी फक्त तीन ते चार खात्यांवर चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही त्यावर चर्चा करून निर्णय घेऊ”, असं फडणवीस म्हणाले.
तसंच पुढे फडणवीस यांनी “तसं बघायला गेलं तर गृहमंत्रीपद आमच्याकडेच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. परंतु, तसा काही हट्ट नाही. आजवर हे खातं आमच्याकडे राहिलं आहे.”, असं म्हटलं. आम्ही तिघेही एकत्रच आहोत.
मात्र, गृहमंत्रीपद सांभाळत असताना केंद्र सरकारशी, केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय ठेवावा लागतो. मी केंद्रीय गृह मंत्रालयाशी चांगल्या प्रकारे समन्वय साधू शकतो. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार देखील ते करू शकतात. परंतु, माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्तीत जास्त संबंध येतो. त्यामुळे गृहमंत्रालय हे आमच्याकडे असावं, असं मला वाटतं, असंही फडणवीस म्हणाले.