मुंबई : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्सही वाढला आहे. दरम्यान, सत्तास्थापनेच्या गदारोळात एकनाथ शिंदे अचानक गावी गेल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , एकनाथ शिंदे अचानक गावी का गेले, याबाबत शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही सकाळपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो. उद्या ते परत येतील आणि भेटीगाठींसोबतच व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, मोबाईलच्या माध्यमातूनही चर्चा होतील.
एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ लवकरच निश्चित होईल, असंही सामंत यांनी स्पष्ट केलं तसेच, सरकार स्थापन करण्यासाठी वेळ लागत आहे. पण सरकार स्थापन करण्यामध्ये कोणतीही अडचण नाही. भाजप नेत्याची लवकर निवड होईल. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नाही. प्रत्येकाला धावपळीमुळे अडचणी निर्माण होतात. वातावरण बदलासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.