केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून तीन मोठ्या रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या रेल्वे मार्गांना पूर्ण करण्यासाठी ७ हजार ९२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातील दोन रेल्वे मार्गांचा महाराष्ट्रात समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , रेल्वेने मंजुरी दिलेल्या तीन प्रकल्पांमध्ये जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग १६० किलोमिटर, भुसावळ ते खंडवा तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्ग १३१ किलोमिटर आणि प्रयागराज माणिकपूर तिसरा रेल्वे मार्ग ८४ किलोमिटर या प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती आहे.
या रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाल्यामुळे, या मार्गावरून होणाऱ्या माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूकीला चालना मिळणार आहे. तसंच या मार्गांवरच्या प्रवासी गाड्यांची संख्याही वाढणार या कामामुळे स्थानिक रोजगार निर्मिती पर्यटन स्थळांना चालना मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मेंद्र मीना यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह तीन राज्यातींल सात जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गामुळं रेल्वेचे जाळे 639 किमीने वाढणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासोबतच मुंबई-प्रयागराज मार्गावरील गर्दी कमी होणार आहे. चार वर्षात हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत, असंही सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, हा प्रस्तावित प्रकल्प मुंबई-प्रयागराज-वाराणसी मार्गावर अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्यासाठी कनेक्टिव्हीटी वाढवणार आहे. तसंच, याचा फायदा नाशिक (त्र्यंबकेश्वर), खंडवा (ओंकारेश्वर), आणि वाराणसी (काशी विश्वनाथ) येथील ज्योतिर्लिंगांना जाणाऱ्या यात्रेकरूंना तर होईलच पण त्याचबरोबर प्रयागराज, चित्रकूट, गया आणि शिर्डी येथील धार्मिक स्थळांवरील पर्यटनदेखील वाढणार आहे, असं सरकारने सांगितले.
या प्रकल्पामुळं महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळ असलेले अंजठा-एलोरा, देवगिरी किल्ला, रेवा किल्ला, यावळ अभयारण्य, केवोती धबधबा, असीरगड किल्ला यासारख्या विविध आकर्षणाचे केंद्र असलेल्या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याचा विचार आहे, असंही सरकारने नमूद केलं आहे.
मनमाड ते जळगावदरम्यान 160 किमी लांबीची चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे. यावर 2773 कोटी रुपये खर्च येणार आहे. भुसावळ ते खंडवा या मार्गावर 131 किमी लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे. यावर 3514 कोटी रुपये खर्च येणार आहे.