गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. त्यातच आता मुंबईतील वांद्रे परिसरात एका पोर्शे कारचा अपघात झाला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही कार मुंबईतील बड्या उद्योगपतीचा 19 वर्षीय मुलगा चालवत होता. ध्रुव नलिन गुप्ता असं त्याचं नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेल्या वांद्रे परिसरातील साधू वासवानी चौकात एक भीषण अपघात घडला. शनिवारी पहाटे एका भरधाव पोर्शे गाडीने फूटपाथजवळ उभ्या असलेल्या दुचाकींना धडक दिली. यावेळी ही पोर्शे कार 19 वर्षीय ध्रुव गुप्ता चालवत होता. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
या व्हिडीओत पहाटेच्या सुमारास पोर्शे कार ही भरधाव वेगात साधू वासवानी चौकातून जाताना दिसत आहे. अचानक ही कार नियंत्रणाबाहेर गेली आणि ती रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या काही दुचाकींना धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की काही दुचाकींचा चक्काचूर झाला. सुदैवाने ही कार झाडावर आदळ्याने मोठी दुर्घटना टळली.
या अपघातात कुणीही जखमी झालं नाही. या गाडीत चार जण होते. ही गाडी 19 वर्षीय ध्रुव गुप्ता चालवत होता. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आणि एक मैत्रीणही याच गाडीतून प्रवास करत होते.
या अपघातानंतर गाडीत बसलेली तरुणी काचेतून एक बाटली बाहेर फेकतानाचे दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाले. त्या तरुणीने फेकलेली ती बाटली दारुची होती का? पुरावे नष्ट करण्यासाठी असे करण्यात आले का? असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत. तसेच या गाडीत बसलेले सर्वजण नशेत होते का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या ध्रुव गुप्ताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले आहेत. ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याचा अहवाल आल्यानंतर याबद्दलची संपूर्ण माहिती समोर येणार आहे.