मुंबई : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीला 230 पेक्षा अधिक जागा मिळाल्या तर विरोधी पक्षातील महायुतीच्या पारड्यात फक्त 49 जागा वाट्याला आल्या. विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी 29 जागांची आवश्यकता होती. मात्र महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला 29 जागा मिळाल्या नाहीत.
त्यामुळे विधानसभेत विरोधी पक्ष नेते पद रिक्त राहणार का याची चर्चा होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेतेपद देण्याचा ठरवलं तर त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी भूमिका देवेंद्र फडवणीस यांनी घेतली आहे.
विधानसभा सदस्य म्हणून आज विरोधकांनी आमदार पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री दालनात जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेते पदाची मागणी केली आहे. याचसोबत विधानसभेचे उपाध्यक्ष पद देखील देण्यात यावे, असेही सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात नाना पटोले, भास्कर जाधव यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात हजर होते.
याबाबत देवेंद्र फडवणीस म्हणाले की, विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष करत असतात. मागच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास काँग्रेस पक्षाला जागा नसतानाही विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. त्याच पद्धतीने विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता पद देण्याचा निर्णय घेतला, तर त्याला आम्ही सत्ताधारी पक्ष म्हणून निश्चितच पाठिंबा देऊ, अशी स्पष्ट भूमिका देवेंद्र फडवणीस यांनी जाहीर केली आहे.
आता देवेंद्र फडणीस यांनी विरोधी पक्षनेते बाबत सकारात्मक भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेते पद कुणाकडे जाणार ? याची सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे.