राज्यातील प्रवास आता महागणार आहे. रिक्षा, टॅक्सी, एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रिक्षा, टॅक्सी आणि एसटीच्या तिकीटाचे दर १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासह राज्यभरातील प्रवास महागणार आहे. राज्य सरकारने परिवहन विभागाचा आढावा घेतला.
रिक्षा, टॅक्सी, एसटी तसेच राज्यातल्या विविध शहरांमधील बस तिकीट दरांमध्ये १५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात ३ ते ४ रुपयांनी, तर बसच्या तिकीट दरामध्ये १ ते ५ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या १५ जानेवारीला म्हणजे बुधवारी होणाऱ्या बैठकीत या भाडेवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामार्तब होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच परिवहन विभागाचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी, रिक्षा, शहरातील बससेवेच्या तिकीटदरांसंदर्भात निर्णय घेण्याबाबत निर्देश दिले होते.
सरकारकडे रिक्षा, टॅक्सीचालक संघटना, एसटी महामंडळ आणि इतर शहरांतील परिवहन उपक्रमांनी भाडेवाढीसंदर्भात विविध प्रस्ताव दिले आहेत. यासंदर्भात एकत्रित निर्णय घेतला जाणार आहे. ही दरवाढ किमान १५ टक्के असण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव तयार असून आता १५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे.