मुंबई : लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल, असं वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचे पडसाद विरोधी पक्षातही उमटू लागले आहेत. लाडकी बहीण योजनेची नव्याने चौकशी झाल्यास साठ लाखांहून अधिक महिला योजनेतून बाद होतील, असा दावा ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केलं आहे.
लाडकी बहीण योजनेवर विनायक राऊत म्हणाले, 'केवळ विधानसभा निवडणुकीत फायदा होण्यासाठी महिलांना पैसे दिले आहे . या योजनेची नव्याने चौकशी झाल्यानंतर साठ लाखांहून अधिक महिला या योजनेतून बाद होतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले, 'शिर्डीमधील त्यांच्या कार्यक्रमात येऊन त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल बोलावं लागतं, याचाच अर्थ राज्यात उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रात वर्चस्व आहे हे मान्य करावं लागेल.
राज्यातील इतर घटनांवर न बोलता फक्त टीका करतात. निधीच्या बाबतीत महाराष्ट्राला डावललं जात आहे. यावर न बोलताना ते म्हणाले की , उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका करणार असतील , तर त्यांनी वारंवार महाराष्ट्रात यावं.
यावेळी आगामी महापालिका निवडणुकीवरही राऊत यांनी भाष्य केलं. शिवसेनेने स्वबळावर लढण्याची भूमिका अद्याप तरी घेतलेली नाही. ती कार्यकर्त्यांची भावना होती. स्वबळावर लढण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे राऊत पुढे म्हणाले.