मुंबई : मुंबईमधून अनेक महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. नुकतेच बदलापूरकरांनी स्टेशनवर मोठे आंदोलन केले होते. एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने २ चिमुकलींवरलीं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना ताजी असतानाच अल्पवयीन अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कांदिवली येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले असल्याचं पाहून शेजाऱ्याने हा प्रकार केला आहे. जबरदस्ती घरात प्रवेश करत अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केला आहे.
याप्रकरणी कुरार पोलिसांनी २३ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. घडलेल्या प्रकारानंतर मुलगी काही दिवस काही बोलत नव्हती. त्यामुळे आईला शंका आली. आईने मुलीला धीर देऊन विचारणा केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला आहे.
आईच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ वर्षीय इसमाला कूरार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७४ (विनयभंग) आणि ३३३ (ट्रेसपासिंग) सह बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या कलम ८,१२ अंतर्गत अटक केली आहे.
या घटनेनंतर महिलांवर लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं दिसत आहे. अशा प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.