राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून आजपासून शिवस्वराज यात्रेला सुरूवात होत आहे. शिवनेरीवरुन आज या यात्रेचा शुभारंभ झाला असून यात्रेच्या पहिल्याच शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेन च्या सहाय्याने पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे तसेच मेहबूब शेख थोडक्यात बचावले. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून आजपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होत आहे. शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करुन या यात्रेला सुरूवात होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख आदी नेते यावेळी उपस्थित होते.
शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख क्रेनमध्ये बसले होते. या दरम्यान, क्रेनमध्ये बिघाड झाल्याने जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे पडता पडता वाचले अन् मोठी दुर्घटना टळली.