राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन
राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन
img
दैनिक भ्रमर
मुंबई: कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आजपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळविले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेसुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेने आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. मागण्या पूर्ण होईपर्यंत हे 'काम बंद आंदोलन' करण्यात येणार आहे.  या निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेक नियोजित शस्त्रकिया रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे तसेच नियोजित शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही. 

या आहेत मागण्या?
केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये.
तज्ज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी.
वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या अद्ययावत खोलीची व्यवस्था करावी.
रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावे, 
पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.
इतर बातम्या
Join Whatsapp Group