मोठी बातमी : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर
मोठी बातमी : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देण्याचा ठराव विधानसभेत मंजूर
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विधानसभेने एक महत्त्वाचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा ठराव मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत मांडला.

भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत मांडलेल्या या ठरावाला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान, हा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आनंद व्यक्त

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च ‘भारतरत्न’ पुरस्कार प्रदान करुन गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा महाराष्ट्र विधानसभेनं एकमताने मंजूर केलेला ठराव ऐतिहासिक असून प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्राच्या लौकिकात भर घालणारा तसेच ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, संपूर्ण देशवासियांच्या लोकभावनेचा आदर करणारा हा ठराव सर्वांनुमते मंजूर होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व विधीमंडळ सदस्यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहे.

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करून, स्त्रीशक्तीला शिक्षणाची दारे खुली करुन दिली. शेती, शिक्षण, ज्ञान, विज्ञान, संशोधन, अंतराळ, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रात महिला मोठ्या संख्येने जबाबदारीच्या पदांवर काम करत आहेत. देशाच्या विकासात आपले योगदान देत आहेत. याचे संपूर्ण श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी त्या काळात दाखवलेल्या दूरदृष्टीला, घेतलेल्या कष्टाला आहेत. समाजातील दुर्बल, वंचित, बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी या दांपत्याने केलेलं कार्य अलौकिक आहे.

त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी घटकांसह समस्त देशवासियांसाठी ते कायम ‘महात्मा’ राहणार आहेत. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला ठराव हा लोकभावनेचा आदर करणारा आणि ‘भारतरत्न’ पुरस्काराचा गौरव वाढवणारा ठराव आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group