गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 7 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने रांगेहाथ पकडले आहे.

संतोष सुधाकर फलके, (वय 40, पोलीस हवालदार, नेमणूक श्रीगोंदा पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर सध्या रा. जकाते वस्ती, दिगंबर बढे यांचे फ्लॅटमध्ये भाडोत्री, श्रीगोंदा, ता. श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर मुळ रा.प्लॉट नंबर १३, शिवनगर, सावेडी, अहिल्यानगर) असे लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व त्यांचे इतर 13 नातेवाईक यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संतोष फलके यांच्याकडे आहे. या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी संतोष फलके यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपये लाच मागणी केल्याबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती.
ही लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.27 फेब्रुवारी रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी संतोष फलके यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्याविरुद्ध व इतर 13 नातेवाईक यांचेविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी प्रत्येकी 500 प्रमाणे एकूण 7,000 रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
दि.27 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी फलके यांनी तक्रारदार यांचे कडून 7,000 रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस अंमलदार महिला पोलीस हवालदार राधा खेमनर, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, चापोहेकॉ. दशरथ लाड यांनी केली.