महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात देवदर्शनासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन डॉक्टर बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे झालेल्या या अपघातात डॉ.तन्वी आचार्य (50) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या डॉ.नीलम पंडित (55) यांनी रुग्णालयात उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार , उज्जैनला जात असताना रविवारी सकाळी गुना-शिवपुरी या मार्गावर हा अपघात झाला. तर आणखी चौघे जणा गंभीर जखमी आहेत. डॉ. उदय जोशी (64),डॉ. सीमा जोशी (59) दोघे रा.दादर,डॉ.सुबोध पंडित (62) रा.वसई, डॉ.अतुल आचार्य (55) रा. भिवंडी अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर तेथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्दैवी घटनेची माहिती समजताच भिवंडीत हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टर अतुल आचार्य यांच्या पत्नी आणि मेहुणीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून वैद्यकीय वर्तुळातही दुःखाचे वातावरण आहे.