चोपडा (जळगाव) : शेतातुन उत्पन्न घेण्यासाठी कर्ज काढले. मात्र अतिपावसामुळे होत्याचे नव्हते झाले. कांदा लागवड केली पण भाव कमी झाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे याची चिंता होती. याच चिंतेत अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चोपडा तालुक्यातील अडावद येथे समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , चोपडा तालुक्यातील अडावद येथील माळीवाडा परिसरात वास्तव्यास असलेले नवल ताराचंद महाजन (वय ५४) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. नवल महाजन हे अल्पभूधारक शेतकरी होते.
शेती कसण्यासाठी त्यांनी अडावद विविध कार्यकारी सहकारी संस्थेकडून कर्ज घेतले होते. त्यांनी खरीप हंगामात मका लागवड केली होती. मात्र, अतिपावसामुळे मका शेतातच सडला. यामुळे उत्पन्न शून्य आले. शिवाय सडका मका शेतातून बाहेर काढण्यास खर्च लागला.
दरम्यान शेती मशागत, बियाणे, रासायनिक खते, फवारणी, मजुरी असा सर्व खर्च अंगावर पडला. यानंतर उसनवारीने पैसे घेऊन रब्बी हंगामात त्यांनी कांदा लागवड केली. कांदा काढणी केल्यानंतर विक्री करून आपले सर्व कर्ज फिटेल, या आशेत ते होते. मात्र कांद्याचे भाव गडगडल्याने येणाऱ्या उत्पन्नातून सोसायटीचे कर्ज व हातउसनवारीचे पैसेही फिटणार नव्हते. यामुळे ते चिंतेत पडले होते.
पुढील हंगाम व घर चालविण्यासाठी पैसा कसा उभारायचा या विवंचनेत होते. यातच त्यांनी टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपविली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.
याबाबत माहिती मिळताच अडावदचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, उपनिरीक्षक राजू थोरात यांनी पंचनामा करून पोलिसात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.