12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार
12 वर्षीय शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार
img
दैनिक भ्रमर

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- पुण्यात स्वारगेट बसस्थानकातील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच सुरक्षित समजल्या जाणार्‍या मुंबईत सामूहिक अत्याचाराची भयंकर घटना समोर आली. पाच आरोपींनी मिळून शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्‍वरीत घडला. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्‍वरीत काही दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शाळा सुटल्यानंतर घरी आलेली 12 वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. पीडित मुलगी तिच्या काकांसोबत मुंबईतील जोगेश्‍वरी परिसरामध्ये राहते. दि. 24 फेब्रुवारी रोजी शाळा सुटल्यानंतर ती बेपत्ता झाली होती.

पीडित मुलीचे काका ड्रायव्हर असून त्यांनी 26 फेब्रुवारी रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा जोगेश्‍वरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पीडित मुलगी दादर रेल्वे स्थानकात भटकत असताना रेल्वे पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली. यानंतर दादर रेल्वे पोलिसांनी तत्काळ जोगेश्‍वरी पोलिसांशी संपर्क साधला. पीडित मुलीच्या जबाबानंतर आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार आणि पोस्को कायदाअंतर्गत 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर जोगेश्‍वरी पोलिसांनी अत्याचार करणार्‍या पाचही नराधमांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी हे एसी मेकॅनिक आहेत. शाळा सुटल्यानंतर मुलगी एकटी असल्याचे बघून आरोपी तिला जोगेश्‍वरीतील संजय नगर भागातील घरी घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. सध्या जोगेश्‍वरी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

पीडित चिमुकलीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सीसी टीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे. मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी जमाल, आफताब, महफुज, हसन आणि जाफर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या आकेवारीनुसार, गेल्यावर्षी बलात्काराचे 1050 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी 983 गुन्हे अल्पवयीन मुलींशी संबंधित आहेत. यामध्ये 1231 अल्पवीन मुलींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात महिला अत्याचार संबंधित 622 गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी 447 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये बलात्काराचे (82), अपहरण (128) आणि विनयभंग (231) गुन्ह्यांची नोंद आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group