मुंबई : मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील २६ जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाला बसणार आहेत. लाखो मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील लोणावळ्यापर्यंत आले आहेत. दरम्यान, आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात परवानगी नाकारली आहे. काल हायकोर्टात या आंदोलनाबाबत एक सुनावणी झाली या सुनावणीत हायकोर्टाने मुंबई पोलिसांना याबाबत आदेश दिले होते.
मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणासाठी आझाद मैदानात परवानगी नाकारण्यात आली आहे. खेळासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी नाही, असं उत्तर आझाद मैदान पोलिसांनी आयोजकांना दिलं आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचंही पोलिसांनी सांगितलं. आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगेंना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवलं आहे.
एकीकडे आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारी सुरु केली आहे. मनोज जरांगे हे उद्या 26 जानेवारीला आझाद मैदानात दाखल होत आहेत. "आम्ही यापूर्वीच पत्रव्यवहार केला होता. आझाद मैदानाची परवानगी आधीच मागितली होती.आम्ही स्टेज बांधण्याचं काम सुरु केलं आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनही याच मैदानात करणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं आहे.
मनोज जरांगे यांना नोटीस
दरम्यान, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडेल असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत.
पोलीसांनी नेमकं पत्रात काय म्हटले आहे?
ज्याअर्थी, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई येथे विविध वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वकालती व इतर वित्तीय केंद्रे कार्यरत आहेत. मुंबईत अंदाजे दररोज 60 ते 65 लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करत असतात. सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठया वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होईल आणि मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे 7000 स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता 5000 ते 6000 आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे. परंतु तेथे प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानात पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही व त्याप्रमाणात सोयी सुविधा देखील तेथे नाहीत. तसेच उर्वरित मैदान क्रीडा विभागाच्या अख्यत्यारित असून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान ३०२४/प्र.क. १२/२०२४/कीयुसे-१, दि. २४.०१.२०२४ अन्वये तेथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.