वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अखेर तीन दिवसांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या . 60 तासांनंतर पोलिसांना मिहीर शाहाला अटक करण्यात यश आलं आहे. मिहीर शाह हा पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल केसकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अपघातानंतर मिहीर शाह तीन दिवस फरार होता. मात्र, पोलिसांनी मिहीरचा 60 तासांचा खेळ, 15 मिनिटांत संपवला.
कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
वरळीत दुचाकीवरील पती-पत्नीला मिहीर शाहाने बीएमडब्ल्यूने टक्कर मारली. टक्कर मारल्यानंतर त्याने महिलेला तसंच काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आणि पती जखमी झाला. यानंतर मिहीर शाहने पळ काढला.अपघातावेळी मिहीर शाहा स्वतः गाडी चालवत होता आणि मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातानंतर मिहीर शाहला पळण्यासाठी त्यांच्या वडिलांनीच मदत केल्याचं सांगितलं जात आहे.
मिहीर शाहला अखेर अटक
आरोपी मिहीर शाह हा त्याचे मित्र आणि कुटुंबियांसोबत शहापूरला रिसोर्टमध्ये होते. मित्र आणि त्याने स्वत: मोबाइल बंद ठेवल्यामुळे पोलिसांना त्यांचा ठिकाणा लागत नव्हता. मिहीर हा त्याचा पालघर आणि बोरिवलीच्या एका मित्राच्या दुसऱ्या फोनवरून अनेकांशी संवाद साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सकाळी 15 मिनिटांसाठी मिहीरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला. अवघ्या 15 मिनिटांत पुन्हा फोन बंद करण्यात आला. पण, हा फोन पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता, त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं.
नेमकं काय घडलं?
मिहिरचा फोन फक्त काही मिनिटांसाठी सुरु झाला होता, पण तेवढ्यात त्याच्या फोनचं लोकेशन पोलिसांना सापडलं. मिहीरच्या मोबाईलचं लोकेशन विरारला ट्रेस झालं. पोलिसांचा संशय बळावल्याने वरळी पोलिसांचे बोरिवली येथे असलेले पथक विरारच्या लोकेशनवर पोहोचलं. पोलिसांचे पथक विरारला घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी मिहीरला ताब्यात घेतलं, तर उर्वरित 12 जणांना शहापूरमधून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.