मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- काळाचौकी परिसरात गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे.
मिंट कॉलनी परिसरातील एका शाळेत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
सुदैवाने संक्रांतीची सुट्टी असल्याने शाळा बंद होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. शाळा बंद असल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बंद असलेल्या बीएमसीच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आग लागली होती. कोविडमध्ये या शाळेचा वापर केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती. मात्र त्या काळात वापरले गेलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते. याच सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे आतमध्ये असलेल्या गाद्यांनी पेट घेतला आणि आगीने रौद्ररुप धारण केले.
एकापाठोपाठ एक सहा स्फोटांचा आवाज आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या शाळेत एक लग्नाचा हॉल असल्याचीही माहिती आहे. याठिकाणी केटरींगचा व्यवसाय चालतो, त्यासाठी ही सिलिंडर तिथे ठेवले असून त्याचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.