देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कार दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू
देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; कार दरीत कोसळून 4 जणांचा मृत्यू
img
दैनिक भ्रमर

जळगाव (भ्रमर वृत्तसेवा) :- देवदर्शनावरून परतताना कारला झालेल्या भीषण अपघातात 4 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अक्कलकोटहून दर्शन घेऊन परतणारी गाडी थेट दरीत कोसळली. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या कन्नड घाटात हा भीषण अपघात झाला आहे.

कन्नड घाटात रात्री 12 वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करुन परतणाऱ्या जानेवाडी (ता. मालेगाव) येथील भाविकांच्या खासगी वाहनाला गंभीर अपघात झाला. वाहन हे खोल दरीत कोसळल्याने चार जण ठार तर 7 जखमी झाले आहेत. अपघातातून बचावलेल्या मुलाने प्रसंगावधान राखत घटनेची माहिती दिल्यानेच रात्री 1 वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्या टीमसह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलिसांसोबतच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना खोल दरीतून वर काढले.

रात्री घाटात प्रचंड धुके होते. पाऊसही असल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चार पथके तयार करुन जखमींना मदत करण्यात आली. अपघातात पती - पत्नीसह लहान मुलगी मृत झाली आहे. 

जानेवाडी येथील काही भाविक खासगी वाहनाने गाडी (क्र. एमएच 41 व्ही 4816) ने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. ते औरंगाबादहून कन्नडघाटमार्गे चाळीसगावकडे येत असताना घाटमार्ग संपण्याच्या एक किमी अगोदर हा अपघात घडला. गाडीचा चालक अभय पोपटराव जैन (वय 50) हा काचेवर धुक्यामुळे आलेली वाफ कापडाने पुसत असतांनाच त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले.

यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. काल घाटात पाऊस व वादळीवाऱ्यासह धुकेही होते. काही ठिकाणी दरडीही कोसळल्या आहेत. पोलिसांनी घाटात वाहने सावकाश व सावधानतेने चालविण्याचे आवाहन केले आहे.

अपघातील मृतांची नावे- प्रकाश गुलाबराव शिर्के (वय 65), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय 60), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय 35), पूर्वा गणेश देशमुख (वय 8 ) 
अपघातातील जखमींची नावे अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय 20), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय 17), सिध्देश पुरुषोत्तम पवार (वय 12), कृष्णा वासुदेव शिर्के (वय 4), रुपाली गणेश देशमुख (वय 30), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय 35).
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group