नाशिक (प्रतिनिधी) :- राज्य सरकार शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल; पण विरोधक आपल्याला शेतकऱ्यांचा खूप पुळका आहे, असे दाखवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला उपदेश देण्याचे कार्य करीत आहेत, ते थांबविण्याचे आवाहन राज्याचे पुनर्वसन व मदतकार्य मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना सांगितले, की उद्धव ठाकरे यांचे सरकार होते, त्यावेळी त्यांनी कसे दौरे रद्द केले व तसेच दौरा कशा पद्धतीने केला, हे फार जवळून बघितले आहे. राज्यातील तर जनतेला हे माहीतच आहे, की त्यांनी राज्यात कशाप्रकारे कार्यक्रमांना हजेरी लावली.
त्यामुळे त्यावर त्यांना बोलण्याचा आता कोणताही अधिकार नाही, असे स्पष्ट करून पाटील पुढे म्हणाले, की जरी मुख्यमंत्री इतर राज्यांच्या प्रचार दौऱ्यांमध्ये असले तरीही त्यांनी अधिकार दिलेले मंत्री हे काम करीत आहेत. राज्य सरकारमधील अधिकारी काम करीत आहेत, मग मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्यात काय अर्थ आहे? आज त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे पालन करूनच आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे विरोधकांनी उगाच आपणच काम करतो, असा बाऊ करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.