एकनाथ शिंदेचे राजकारणातील वजन वाढले, थेट राजस्थानच्या माजी मंत्र्यांचाच शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदेचे राजकारणातील वजन वाढले, थेट राजस्थानच्या माजी मंत्र्यांचाच शिवसेनेत प्रवेश
img
Dipali Ghadwaje
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आधी काही राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. दरम्यान ठाकरे गटासह काँग्रेस-राष्ट्रवादीतून नेत्यांची आयात झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये त्यांच्या पक्षाचा विस्तार करत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी शिंदेंच्या जयपूर दौऱ्यात राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस आमदारानेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

राजस्थानचे निलंबित मंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्रसिंह गुढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशोक गहलोत यांच्याशी एकेकाळी जवळीक राहिलेल्या गुढांनी त्यांना मुख्यमंत्री करण्यात मोठा वाटा उचलला होता.

माझा आशीर्वाद नसता, तर गहलोत कधीच मुख्यमंत्री झाले नसते, असा दावा गुढा यांनी नुकताच केला होता. मला वसुंधरा राजेंनी तुरुंगात टाकलं, अन् त्यांच्या बातम्या येणंच थांबलं, त्यामुळे गहलोतांनी मला जेलमध्ये टाकलं, तर त्यांच्याही चर्चा बंद होतील, असं गुढा म्हणाले होते. २४ जुलै रोजी विधानसभेत लाल डायरी झळकवल्याबद्दल बडतर्फ झालेल्या गुढा यांची विधानसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

राजेंद्रसिंह यांचा मुलगा शिवम गुढा याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिंदे त्यांच्या गावी गेले. यावेळी गुढांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे दिल्लीला रवाना होतील.

शिवसेनेचे राजस्थानचे प्रभारी चंद्रराज सिंघवी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुढांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत माहिती दिली होती. गुढा शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा काही दिवसांपासून होती, मात्र त्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली जात होती.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group