राज्यातील राजकारण अतिशय खालच्या पातळीला गेले आहे. एकमेकांवर टीका करण्यातच राजकारणी वेळ घालवत आहेत. आज या पक्षात असणारा उमेदवार दुसऱ्या पक्षात कधी जाईल, हे पण सांगता येत नाही.
आयाराम-गयारामसंदर्भात कायदे झाले. परंतु त्यातून पळवाट काढल्या जात आहेत. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात दोन वेळा बंड झाले. या सर्व प्रकारामुळे पुणेकरांनी अनोखा तोडगा काढला आहे. ‘जागृत पुणेकर’ नावाने एक मोहीम सुरु केली आहे. ‘जागृत पुणेकर’ नावाने शहरात पोस्टर्स लावले गेले आहेत.
नेमके लिहिले काय आहे पोस्टर्समध्ये
रहा एक पाऊल पुढे, महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी… या आशयाचे पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. त्यात आवाहन जागृत पुणेकरांचे असा मथळा आहे. त्यात म्हटले आहे की, उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या. त्यांनी आपल्या परिचय पत्रकामध्ये एकच उल्लेख करावा. “मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी पाच वर्ष प्रामाणिक राहील.
कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील इतरांना निवडून देऊ नका” असा मजकूर दिला आहे. जे उमेदवार आपल्या परिचय पत्रकात हे लिहितील, त्यांनाच मतदान केले जाईल, असे म्हटले आहे.
हे बॅनर्स कोणी लावले आहे? त्याची काहीच माहिती नाही. सोशल मीडियावर हे बॅनर्स चांगलेच व्हायरल झाले आहे.