पुणे : पुणे शहर हे आता शिक्षणाचं माहेर घर नव्हे तर गुन्हेगारांची मायानगरी झाली आहे. पुण्यात दिवसाढवळ्या खून, गोळीबार अन् बलात्काराच्या घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणानतंर पुण्यात दोन खुनाच्या घटना समोर आल्या.
हडपसरमध्ये एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या झाली होती. तर आता आणखी एक हत्या झाली आहे. गुलटेकडी परिसरात मध्यरात्री तरुणाची हत्या करण्यात आलीय. मोक्का अंतर्गत अटक झालेल्या आणि जामिनावर सुटलेल्या आरोपींनी ही हत्या केलीय. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सुनील सरोदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
सुनील सरोदे याची हत्या रोहन कांबळे आणि शिवशरण कांबळे या दोघांनी केलीय. दोघेही मोक्यातील आरोपी असून ते जामिनावर बाहेर होते. दरम्यान, हत्या का करण्यात आली हे अद्याप समोर आलेलं नाही.
तर हडपसरमध्ये मोबाईलचा हॅाटस्पॅाट न दिल्यान चार आरोपींनी वासुदेव कुलकर्णी यांचा खून केला. आरोपींना एनर्जी ड्रींक खरेदी करायचे होते. त्यासाठी त्यांना ॲानलाईन पेमेंट करायचे होते. ॲानलाईन पेमेंट करण्यासाठी आरोपींनी वासुदेव कुलकर्णी यांना हॅाटस्पॅाट मागितले. कुलकर्णी यांना हॅाटस्पॅाट देण्यास नकार दिला.
त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यात आरोपींनी कुलकर्णी यांच्यावर धारधार शस्रांनी वार केला. त्यात कुलकरर्णी यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून तीन आरोपी अल्पवयीन आहेत.