पूर्ववैमनस्यातून नाशिकरोडला युवकाची निर्घृण हत्या
पूर्ववैमनस्यातून नाशिकरोडला युवकाची निर्घृण हत्या
img
दैनिक भ्रमर
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या हाणामारीचा राग मनात ठेवून सुंदरनगर येथील युवकावर सात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी तीन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की देवळाली गावातील सुंदरनगर येथील अरमान मुनवर शेख (वय 18) हा काल (दि. 7) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच्या मित्रासोबत सुंदरनगर, रोकडोबावाडीमार्गे जय भवानी रोडकडे जात होता. शेख हा अण्णा गणपती रोडकडून रोकडोबावाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आला असता तेथे असलेल्या स्पीड ब्रेकरजवळ दबा धरून बसलेले हल्लेखोर आकाश तपासे, टक्या, झिंग्या, रवी राठोड, आकाश दिनकर व दोन अनोळखी युवकांनी शेख याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला चढविला.

त्यात पाठीवर, डोक्यावर वर्मी मार लागल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हा प्रकार लक्षात आल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी शेख याला औषधोपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. ही माहिती समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी व बिटको रुग्णालयात धाव घेतली.

त्यानंतर संशयितांचे शोधकार्य सुरू केले. त्यादरम्यान गुन्हेशोध पथकाने पहाटेपर्यंत केलेल्या कारवाईत आरोपी गुंड्या, रवी राठोड व आकाश दिनकर या तिघांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपीच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या खुनाच्या घटनेने नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group