जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तरुणाची ५२ लाख रुपयांची फसवणूक
जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने तरुणाची ५२ लाख रुपयांची फसवणूक
img
दैनिक भ्रमर
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- व्हॉट्सॲपवर चॅटिंग करून ब्रोकर असल्याचे भासवून, तसेच जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात इसमांनी एका तरुणाला 52 लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी रवींद्र संजय भागवत (वय 37, रा. सामनगाव रोड, नाशिकरोड) व साक्षीदार यांना अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकांवरून चॅटिंग सुरू केले. रोज होणाऱ्या चॅटिंगमुळे अज्ञात इसम आणि फिर्यादी व साक्षीदार यांच्यात संवाद वाढला.

त्यादरम्यान अज्ञात इसमाने व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करून फिनविझार्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. या स्टॉक मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचे भासविले. त्यानंतर अज्ञात इसमाने त्यांचा विश्वास संपादन करून एफटीपीएल-पीएम या मोबाईल ॲपवरून इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग अकाऊंटच्या माध्यमातून स्टॉक ट्रेडिंग व आयपीओ कन्फर्म अलॉटमेंटच्या बहाण्याने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर अज्ञात इसमाने त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळू शकतो, असे सांगितले. 

त्यानंतर अज्ञात आरोपीने दि. 7 मार्च ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत फिर्यादी भागवत यांच्या राहत्या घरी मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांवर 51 लाख 72 हजार 394 रुपये ट्रान्स्फर करण्यास संशयिताने भाग पाडले. त्यानुसार फिर्यादी व साक्षीदार यांनी ही रक्कम संबंधिताच्या बँक खात्यांवर जमा केली; परंतु पाहिजे तसा नफा आणि मूळ रक्कम परत मिळत नसल्याने फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली.

त्यानंतर भागवत यांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकधारक इसमाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहेत.



crime |
इतर बातम्या
Join Whatsapp Group