नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- भेटण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या मैत्रिणीने व तिच्या आईने संगनमत करून घरातील 1 लाख 56 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मखमलाबाद येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अनिता चंद्रकांत साळवे (वय 25, रा. रामकृष्णनगर, शांतीनगर, मखमलाबाद) यांची मैत्रीण आरोपी युगंधरा सागर हिरेमठ (वय 28, मूळ रा. कसबे वणी, ता. दिंडोरी, ह. मु. बिदर, कर्नाटक) हिने तिची आई आरोपी राजश्री किशोर गायकवाड (रा. कसबे वणी, ता. दिंडोरी) हिच्याशी संगनमत केले.
हिरेमठ हिच्या पतीने तिच्या आईला उसनवार दोन लाख रुपये दिले होते. ही रक्कम परत करण्यासाठी आरोपी युगंधरा हिरेमठ ही फिर्यादी साळवे यांना भेटण्याचा बहाणा करून तिच्या घरी मुक्कामाला आली. त्यानंतर दोघी मैत्रिणींमध्ये सुखदु:खाच्या गप्पा रंगल्या. त्यानंतर दोघी जणी झोपण्यासाठी गेल्या. त्यावेळी फिर्यादी साळवे यांनी त्यांच्या गळ्यातील 1 लाख 56 हजार 759 रुपये किमतीची व अडीच तोळे वजनाची सोन्याच्या पट्टीत गुंफलेली सोन्याची पोत काढून ती किचन रूममधील काचेच्या बरणीमध्ये ठेवली.
ही बाब झोपेचे नाटक केलेल्या आरोपी हिरेमठ हिने पाहिली. त्यानंतर फिर्यादी साळवे या गाढ झोपेत असताना आरोपी हिरेमठ हिने किचन रूममध्ये प्रवेश करून काचेच्या बरणीमध्ये ठेवलेली सुमारे 1 लाख 56 हजार 759 रुपये किमतीची सोन्याची पोत आरोपीच्या पतीने तिच्या आईला उसनवार दिलेले दोन लाख रुपये फेडण्यासाठी लबाडीच्या इराद्याने घरातून चोरून नेले.
हा प्रकार दि. 17 एप्रिल 2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात युगंधरा हिरेमठ व राजश्री गायकवाड यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गवारे करीत आहेत.