मुंबई : जून महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
जुलै 2024 मध्ये राज्यातील पदवीधर मतदार संघातील दोन आणि शिक्षक मतदार संघातील दोन अशा चार आमदारांची मुदत संपत आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने 8 मे रोजी निवडणुका जाहीर केल्या होत्या.
परंतु, राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सध्या सुट्या आहेत म्हणून या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती राज्यातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने राज्याचे निवडणुकप्रमुख एस. चोकलिंगम यांना केली होती. त्यांनी सदरचे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविले होते.
निवडणूक आयोगाने या शिष्टमंडळाच्या निवेदनाचा विचार करून सदर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय दिला. याबाबत आज निवडणूक आयोगाचे सेक्रेटरी सुमन कुमार दास यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना कळविले आहे. निवृत्त होणाऱ्या चार सदस्यांमध्ये येवला येथील आ. किशोर दराडे यांचा समावेश आहे.