३ सप्टेंबर २०२४
कागल : शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला.
आज कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात राष्ट्रवादी मेळावा आणि समरजित घाटगे यांच्या पक्षप्रवेशाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याआधी घाटगे हे गेली दहा वर्षे भाजपच्या माध्यमातून विधानसभेची तयारी करत होते. २०१९ च्या निवडणुकीत कागलची जागा शिवसेनेला गेल्याने घाटगे अपक्ष लढले आणि त्यांनी ८८ हजार मते घेतली.
गेल्यावेळी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीत राष्ट्रवादीत फूट पडली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपसोबत आले. त्यामुळे पुन्हा एकदा पंचाईत झालेल्या घाटगे यांनी यावेळची निवडणूक अपक्ष न लढता कोणत्या तरी पक्षांकडून लढण्याचे संकेत दिले होते. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता.
घाटगे यांच्या या निर्णयामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढून त्यांच्यासमोर विधानसभेत घाटगे यांचे मोठे आव्हान असणार आहे.
Copyright ©2024 Bhramar