.......तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही  ते मी बघून घेतो! नेमकं काय म्हणाले शरद पवार
.......तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही ते मी बघून घेतो! नेमकं काय म्हणाले शरद पवार
img
Dipali Ghadwaje
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं १० पैकी ८ जागा जिंकल्या. या यशानं शरद पवार गटाचा उत्साह प्रचंड वाढलेला आहे. पक्षनेतृत्वानं लागलीच आगामी विधानसभा निवडणुकीचीही तयारी केल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार थेट दुष्काळी दौऱ्यावर निघाले असून, गेल्या काही दिवसांपासून केलेल्या त्यांच्या वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांसाठी मोठा प्लान केला आहे की काय? अशी चर्चा सुरू असतानाच दोन्ही सरकार आज आमच्या हातात नाहीत. पण लोकसभा निवडणुकीत जसं काम झालं, तसं काम केलं तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही ते मी बघून घेतो, असे शरद पवार म्हणाले. लोकसभेला जे योग्य होतं, ते तुम्ही केलं. विधानसभेलाही जे योग्य आहे ते करा, असं आवाहनही त्यांनी जनतेला केलं.

शरद पवार दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. ते आज, बुधवारी बारामतीमधील निरा वागज गावात आले. दौऱ्यातील हे तिसरे गाव आहे. त्यांचं या गावात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. सुप्रिया सुळे यांना तुम्ही निवडून दिलं. त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिलं. हे सर्व तुमच्या पाठिंब्यामुळं शक्य झालं, अशा शब्दांत त्यांनी मतदारांचे आभार मानले. आता विधानसभा निवडणुकीचाही विचार करावा लागेल. राज्य हाती घ्यायचं असेल तर, पुढील दोन-तीन महिने काम करावं लागेल, असंही ते यावेळी म्हणाले.

सत्ता येते, सत्ता जातेही! 

शरद पवार यांनी यावेळी गावकऱ्यांचे आभार मानून कौतुकही केले. ते म्हणाले की, सत्ता येते, तशी जातेही. आलेली सत्ता लोकांच्या जीवनात बदल करण्यासाठी वापरली तर लोक आठवण ठेवतात. काही तात्पुरते यशस्वी ठरतात. मी नेहमी सांगतो की देशात लोकशाहीचं राज्य आहे. या निवडणुकीत वेगळं चित्र होतं. गावचे नेते कुठे होते, कोणास ठाऊक? ज्यांना मोठं केलं ते आसपास दिसतही नव्हते. मतमोजणी जेव्हा झाली, तेव्हा कळलं की गाव मोठ्या नेत्यांच्या हातात नाही. तुम्हाला निवडणुकीत माहिती होतं काय करायचं. आता आमची जबाबदारी आहे, अशी ग्वाहीही शरद पवार यांनी यावेळी दिली. मी बघून घेतो... आजच्या घडीला दोन्ही सरकारे आमच्या हातात नाहीत. कालच्या निवडणुकीत जसं काम झाले आहे, तसं केलं तर राज्य सरकार कसे आपल्या हातात येत नाही ते मी बघतो. लोकसभेला जे योग्य होतं ते केलं. आता विधानसभेलाही योग्य आहे तेच करा, असंही शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group