अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत .दरम्यान, आज मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी संविधानाच्या विषयावर पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची सुद्धा भाषणं झाली.
दरम्यान , “महाराष्ट्राची संकटातून कशी सुटका करता येईल यासाठी आजचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कालच स्वातंत्र्य दिन झाला आहे. आज आपला मेळावा होत आहे. अनेकांची भाषणं झाली. प्रत्येकाने राज्यात जे परिवर्तन करायचं आहे, त्यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रापुरता विचार करण्याचे दिवस आहेत असं वाटत नाही. राज्याचा विचार करावाच लागेल. पण देशावरचं संकट पूर्णपणे गेलं असा निष्कर्ष काढता येणार नाही” असं शरद पवार म्हणाले. ते मुंबईत महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.
“लोकसभा निवडणुकीत आपण संविधानाची भूमिका मांडली होती. जबाबदारीने सांगतो, त्या निवडणुकीत काही प्रमाणात यश आलं आहे. पण संविधानावरचं संकट टळलं असा निष्कर्ष काढता येत नाही. ज्यांच्या हातात सूत्र आहेत देशाची. त्यांचा संवैधानिक संस्था आणि विचारधारा आणि तरतूदी यांच्याबाबत आस्था नाही” असं शरद पवार म्हणाले.
तसेच , “आज देशाच्या संसदेत आम्ही पाहतो, देशाचे पंतप्रधान या संसदेची प्रतिष्ठा किती ठेवतात. या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य आहेत. ते सांगतील. हल्लीच अधिवेशन झालं. लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या अधिवेशनात पंतप्रधान एकदाही सभेत आले नाही. त्या सदनाची किंमत प्रतिष्ठा आणि महत्त्व याकडे ढुंकून पाहत नाही. त्याची प्रचिती आम्हाला वारंवार येत आहे” असं शरद पवार म्हणाले.