सध्या राज्याच्या राजकारणात आरक्षणावरून वातावरण चांगलेच तापलेले असताना एकीकडे राज्यात ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून उपोषणाला बसले आहे तर दुसरीकडे आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील ओबीसी आरक्षण बचाव यात्रेची तयारी सुरु केली आहे.
ही यात्रा 25 जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देणार आहे तर संभाजीनगर येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.
या यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित केले होते तर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना देखील प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांच्यासह आज प्रकाश आंबेडकरांनी राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना देखील या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. तसेच या यात्रेत शरद पवार यांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचेही आंबेडकर म्हणाले आहे. त्यामुळे आता 25 जुलैपासून सुरु होणाऱ्या आरक्षण बचाव यात्रेमध्ये शरद पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.